पदाचा अहंकार नाही, माणुसकीचा आधार; निवृत्त चालकाला स्वतः गाडी चालवत घरी सोडणाऱ्या अधिकाऱ्याची सर्वत्र चर्चा


राजेंद्र खैरनार(पाचोरा) मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
जळगाव : एखाद्या अधिकाऱ्याचे मोठेपण त्याच्या पदामुळे नव्हे, तर त्याच्या वागणुकीतून आणि माणुसकीतून ठरत असते. शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना अधिकार, जबाबदारी आणि प्रशासकीय कौशल्य महत्त्वाचे असतेच; मात्र त्या सर्वांपेक्षा माणुसकीचा स्पर्श अधिक प्रभावी ठरतो. अशीच एक हृदयस्पर्शी घटना जळगाव येथे घडली असून, ती प्रशासनातील संवेदनशीलतेचा आणि सहकाऱ्यांप्रती असलेल्या आदरभावनेचा आदर्श ठरली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील उच्च शिक्षण विभागाचे माननीय सहसंचालक डॉ. पराग मसराम यांच्या कार्यालयातील प्रशासकीय वाहन चालक श्री. रवींद्र दौलतराव पवार यांनी १ जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारली. अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याला कार्यालयामार्फत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
निरोप समारंभात सहकारी, अधिकारी आणि मित्रपरिवाराने त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला. अनेक आठवणींना उजाळा देताना वातावरण भावनिक झाले होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर घडलेली एक घटना उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेली.
सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी पदाचा कोणताही मोठेपणा न दाखवता आपल्या निवृत्त होत असलेल्या सहकाऱ्याला अनोख्या पद्धतीने सन्मान दिला. अनेक वर्षे कार्यालयासाठी वाहन चालवणाऱ्या श्री. पवार यांच्या सेवेला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी त्यांनी स्वतः प्रशासकीय वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले आणि श्री. पवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोहोचविले.
ही कृती केवळ औपचारिक नव्हती, तर ती एका सहकाऱ्याच्या योगदानाचा मनापासून केलेला सन्मान होता. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील नाते केवळ कार्यालयीन मर्यादेत न राहता परस्पर आदर, विश्वास आणि आत्मीयतेच्या बंधनात गुंतलेले असावे, हा संदेश या प्रसंगातून अधोरेखित झाला.
आजच्या काळात पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांचा प्रभाव अनेकदा नात्यांवर पडताना दिसतो. मात्र डॉ. पराग मसराम यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की, खरे नेतृत्व हे पदाच्या उंचीने नव्हे तर मनाच्या विशालतेने ओळखले जाते. वरिष्ठ पदावर असूनही त्यांनी दाखविलेली साधेपणा आणि सहकाऱ्यांप्रती असलेली कृतज्ञता ही प्रशासकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी बाब आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनी आपल्या वाहन चालकाच्या सेवापूर्तीप्रसंगी स्वतः वाहन चालवत त्या कर्मचाऱ्याला घरी पोहोचवून माणुसकीचा आदर्श घालून दिला होता. त्याच परंपरेचा मान राखत डॉ. पराग मसराम यांनीही सहकाऱ्यांप्रती असलेला आदर कृतीतून व्यक्त केला.
प्रशासनातील मानवी मूल्ये जपणाऱ्या अशा घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. कारण पदाचा अधिकार हा तात्पुरता असतो, परंतु माणुसकीतून केलेल्या कृतींची नोंद कायम लोकांच्या हृदयात राहते. म्हणूनच आज डॉ. पराग मसराम यांची ही कृती केवळ एका कर्मचाऱ्याच्या सेवापूर्तीपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श म्हणून चर्चेचा विषय ठरली आहे.
खरोखरच, अधिकारी असावा तर असा...! ज्याच्या पदापेक्षा त्याची माणुसकी मोठी असते आणि ज्याच्या कृतीतून सहकाऱ्यांप्रती असलेला आदर जिवंत होतो.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद