जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा : नागरिकांच्या तक्रारींचे जलद, पारदर्शक व प्रभावी निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पाचोरा उपविभागीय कार्यालयात ‘जनसमाधान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ११० नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
कार्यक्रमापूर्वी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार शितल सोलाट, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शाखाप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या.
दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजित जनसमाधान कार्यक्रमात नागरिकांना टोकन पद्धतीने प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. प्राप्त तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कृषी भवन बांधकाम, नगरपालिका पाचोरा टाऊन प्लॅनिंग स्कीम, काकनबर्डी पर्यटन विकास काम तसेच पाचोरा क्रीडा संकुलाची पाहणी केली. पिंपळगाव हरेश्वर येथील मंदिरास भेट देऊन मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा केली. मंदिराच्या जागेसंदर्भातील मागणी शासनस्तरावर मांडण्याचे आश्वासन देतानाच तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर भडगाव क्रीडा संकुलाला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जिल्हा मुख्यालयापर्यंत घेऊन जाण्याची गरज कमी व्हावी, स्थानिक स्तरावरच त्यांचे निराकरण व्हावे, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भविष्यात दर दोन महिन्यांनी उपविभागातील विविध ठिकाणी जनसमाधान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार शितल सोलाट, मुख्याधिकारी मंगेश देवरे तसेच महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद