जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जनसमाधान बैठक’ उपक्रम; उद्या पाचोरा प्रांत कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद, तक्रार निवारणाला मिळणार गती



राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा, दि. १० जून २०२६ : नागरिकांच्या तक्रारी व समस्या स्थानिक स्तरावरच जलद, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने निकाली निघाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘जनसमाधान बैठक’ या अभिनव उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. ११ जून रोजी पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाचोरा प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या, तक्रारी व मागण्यांबाबत थेट संवाद साधणार आहेत.

प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे आणि नागरिकांना किरकोळ प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये चक्राकार पद्धतीने जनसमाधान बैठका आयोजित केल्या जात आहेत. या बैठकीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले जाणार असून प्रकरणांच्या पाठपुराव्यावरही भर दिला जाणार आहे.

या उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात आला आहे. ‘जनसमाधान पोर्टल’ आणि QR Code आधारित प्रणालीद्वारे प्रत्येक अर्जाची डिजिटल नोंद केली जाणार आहे. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र QR Code देण्यात येणार असून नागरिकांना त्यांच्या अर्जावरील कार्यवाहीची सद्यस्थिती मोबाईलद्वारे ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच संबंधित कार्यालयांना प्रलंबित प्रकरणांबाबत स्वयंचलित स्मरणपत्रे पाठविण्यात येणार असल्याने तक्रार निवारण प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.

दरम्यान, माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज, लोकशाही दिनाशी संबंधित अर्ज, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावयाच्या तक्रारी, न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक व बदलीसंदर्भातील अर्ज या बैठकीत स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाचोरा उपविभागातील नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी व मागण्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद