शैक्षणिक वर्षाची प्रवेशोत्सवाने दमदार सुरुवात; पाचोरा शिक्षण विभाग सज्ज
राजेंद्र खैरनार(पाचोरा) मुख्य संपादक सत्य शोध न्युज
पाचोरा तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाने व्यापक तयारी पूर्ण केली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक वितरण, प्रवेशोत्सव, निपुण अभियान, योग दिन आणि गुणवत्ता विकास कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले असून सुमारे 1 लाख 50 हजार 713 पुस्तके प्राप्त झाली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार आहे.
प्रवेशोत्सवानिमित्त नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळांची आकर्षक सजावट आणि मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ अशा उपक्रमांद्वारे शाळेचे वातावरण आनंददायी करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
निपुण अभियानाच्या अनुषंगाने 11 जून रोजी पाचोरा येथे तालुकास्तरीय आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही सभा दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त तालुक्यातील 257 शाळांमधील सुमारे 60 हजार विद्यार्थी योगाभ्यासात सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याशिवाय यू-डायस पोर्टलवरील विद्यार्थी प्रमोशनचे 80 टक्के आणि अपार आयडीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असल्याने शैक्षणिक प्रशासनाची कार्यक्षमता दिसून येते. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी ‘सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम’ राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाठ्यपुस्तक वितरण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, समन्वयक आणि शिक्षकवर्ग परिश्रम घेत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे पाचोरा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment