दारूबंदी कायद्याचा धडाका! पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू, गुटखा व्यावसायिकांसह तडीपार आरोपीवर गुन्हे


राजेंद्र खैरनार |पाचोरा|मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत दारू निर्मिती केंद्रांवर धाडी टाकल्या. या कारवाईत लाखो रुपयांचे कच्चे व पक्के रसायन, हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली.

मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे शिंदाड, घोडसगाव, सातगाव डोंगरी, कु-हाड, सावखेडा बु., लोहारी व आंबेवडगाव परिसरात छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ४,७९० लिटर कच्चे रसायन, ६८५ लिटर उकळते पक्के रसायन, १३५ लिटर तयार हातभट्टीची दारू आणि दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ९५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

याच मोहिमेदरम्यान पिंपळगाव हरे, कु-हाड व वरखेडी परिसरातील सात जण पानटपऱ्यांवर तंबाखू व बिडीची विक्री करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक अधिनियम २००३ मधील कलम ६ (ब) व २४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, आंबेवडगाव येथील ज्ञानेश्वर समाधान गायकवाड या तडीपार आरोपीस जळगाव जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आलेले असताना तो कु-हाड परिसरातील शेतात आढळून आला. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून आरडाओरडा व धिंगाणा घालणाऱ्या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११२ व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली.

याशिवाय वरखेडी येथील ईश्वर दशरथ भोई यांच्या घरावर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त छापा टाकला. घरझडतीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा ८ हजार ६४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध धंदे, गुटखा विक्री आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद