कापूस व्यापाऱ्याच्या कथित फसवणुकीविरोधात शिवसेने च्या तालुका प्रमुखांनी रणशिंग फुंकले; बाधित शेतकऱ्यांनी पुढे या, सामूहिक लढ्याचे आवाहन!

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारून फरार झाल्याचा आरोप असलेल्या कापूस व्यापाऱ्याविरोधात आता संतप्त शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होत असून शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख श्री. राजेंद्र दगडू पाटील यांनी या प्रकरणात पुढाकार घेत बाधित शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
तारखेडा येथील अनेक शेतकऱ्यांनी कपाशी विक्री करूनही त्यांचे लाखो रुपयांचे देयक अद्याप मिळाले नसल्याचा आरोप व्यापारी श्री. हरिदास मोहनदास ठक्कर यांच्यावर केला आहे. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे लेखी अर्ज दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.
सदर व्यापारी अनेक वर्षांपासून परिसरात कापूस खरेदीचा व्यवसाय करत होते. विश्वासार्ह व्यवहारामुळे त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र अलीकडे अनेक शेतकऱ्यांकडून कपाशी खरेदी करूनही त्यांची रक्कम न देता कुटुंबासह फरार झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात नाना विठ्ठल पाटील, श्रीराम जयराम पाटील, विष्णू एकनाथ पाटील, अशोक ओंकार पाटील, परेश श्रीराम महाजन, नाना धनगर, विष्णू धनगर, प्रफुल वसंत पाटील, साहेबराव त्र्यंबक पाटील, नाना त्र्यंबक पाटील आणि बबन गुजर या शेतकरी बांधवांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार पाचोरा तालुक्यासह परिसरातील इतर अनेक गावांतील शेतकरी देखील या प्रकाराला बळी पडले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख श्री. राजेंद्र दगडू पाटील यांनी सर्व बाधित शेतकरी बांधवांना आवाहन करत सांगितले आहे की, ज्यांनी कपाशी विक्री केली असूनही त्यांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र लेखी तक्रार दाखल करावी. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर मिळालेली अर्जाची पोहोच जतन करून समन्वयासाठी पाठवावी.
या संपूर्ण प्रकरणाचा सामूहिक पाठपुरावा करण्यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी, पुरावे आणि थकीत रकमेची माहिती संकलित करून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सायबर क्राईम विभाग, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), राज्य जीएसटी विभाग तसेच केंद्रीय जीएसटी विभाग यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी तक्रार करताना व्यवहाराशी संबंधित पावत्या, बिल, वजन पावती, बँक व्यवहाराची माहिती, धनादेश, मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप संदेश, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर उपलब्ध पुरावे जोडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून, "घाम गाळून पिकवलेल्या मालाचे पैसे मिळालेच पाहिजेत" अशी ठाम भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
"शेतकऱ्यांची एकजूट, ठोस पुरावे आणि सामूहिक लढा यामुळेच न्याय मिळू शकतो," असा विश्वास व्यक्त करत श्री. राजेंद्र दगडू पाटील यांनी सर्व बाधित शेतकरी बांधवांना भीती न बाळगता पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
आता प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभाग या प्रकरणात कितपत वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करतात, याकडे संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद