वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर लिनेस क्लब पाचोरा कडून कामगारांना ORS वाटप


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
लिनेस क्लब पाचोरा यांच्या वतीने दि. ११ मे २०२६ , सोमवार रोजी पाचोरा येथे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सध्या वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघात, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, याबाबत कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.

लिनेस क्लब च्या अध्यक्षा प्रा. सौ जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदशन व उपस्थितीत , उपक्रमांतर्गत कामगारांना ORS पॅकेट चे मोफत वाटप करण्यात आले. कडक उन्हात दीर्घकाळ काम करताना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा व अशक्तपणा जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी नियमित पाणी पिण्यासोबतच पाण्यात ORS पावडर मिसळून सेवन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच ORS चे फायदे, त्याचा योग्य वापर, उष्माघातापासून बचावाचे उपाय आणि उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.

“आरोग्य हीच खरी संपत्ती” हा संदेश देत कामगारांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. दिवसभर मेहनतीची कामे करणाऱ्या कामगारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी लिनेस क्लब अध्यक्ष प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांनी केले.

या सामाजिक उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरखेडी येथून ORS पॅकेट उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी श्री. दीपक बागुल व श्री. मनोज उत्तम बारी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी लिनेस क्लब पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या समवेत कोषाध्यक्ष सौ. संगीता सिसोदिया, PRO कु. चेतना हिरे , सौ. उज्वला चिरोडिया  उपस्थित होत्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ही कामगारांशी संवाद साधत उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे तसेच पाचोरा येथील सरकारी रुग्णालयात ORS पॅकेट मोफत उपलब्ध असून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या उपक्रमास कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून , लिनेस क्लब पाचोराच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद