“पुरुषप्रधान व्यवस्थेला छेद देत ‘दत्तू मॅडम’ मुख्याध्यापिका पदावर; कै. पी. के. शिंदे विद्यालयाच्या इतिहासात नवा अध्याय”....! कर्तृत्व, शिस्त आणि सेवाजेष्ठतेचा सन्मान; श्रीमती सविता ताड यांच्यावर संस्थेचा विश्वास


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात १ मे २०२६ हा दिवस एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णयामुळे विशेष ठरला आहे. अनेक वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन, विद्यार्थ्यांप्रती ममत्व आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती जपणाऱ्या सेवाजेष्ठ शिक्षिका श्रीमती सविता शशिकांत ताड अर्थात सर्वांच्या परिचयातील “दत्तू मॅडम” यांची कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही केवळ नियुक्ती नाही, तर शिक्षण क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या संघर्ष, संयम आणि कर्तृत्वाचा सन्मान आहे. अनेकदा महिलांच्या कर्तृत्वाकडे दुय्यम नजरेने पाहणाऱ्या व्यवस्थेला हा निर्णय ठोस उत्तर देणारा ठरला आहे. “महिला फक्त शिकवू शकते; नेतृत्व करू शकत नाही,” या जुनाट मानसिकतेला छेद देत संस्थेने एका अनुभवी, अभ्यासू आणि विद्यार्थिप्रिय शिक्षिकेच्या हातात विद्यालयाची धुरा सोपविली आहे.
श्रीमती सविता ताड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयात अत्यंत निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तेची पेरणी केली. त्यांचे अध्यापन हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे राहिले आहे. त्यामुळे “दत्तू मॅडम” हे नाव विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, मायेचा आधार आणि कठोर शिस्त यांचे प्रतीक बनले आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री तात्यासो पंडित शिंदे, उपाध्यक्ष श्री निरज मुनोत, सचिव श्री दादासो जे. डी. काटकर, भाजपा युवा नेते अमोल शिंदे तसेच सहसचिव प्राचार्य शिवाजी शिंदे सर यांनी श्रीमती ताड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
आज शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय पदांवर महिलांचे प्रमाण वाढत असले तरी ग्रामीण व निमशहरी भागात महिला मुख्याध्यापिका होणे हा अजूनही संघर्षाचा विषय मानला जातो. अशा परिस्थितीत कै. पी. के. शिंदे विद्यालयाने घेतलेला हा निर्णय अनेक महिला शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
एका शिक्षिकेच्या डोळ्यातील कष्टांचे अश्रू, विद्यार्थ्यांसाठी केलेली धडपड आणि आयुष्यभराची निष्ठा अखेर मुख्याध्यापिका पदाच्या रूपाने सन्मानित झाली… आणि म्हणूनच ही नियुक्ती केवळ प्रशासकीय नसून, स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारी ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद