पाचोरा शहरात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या बालसंस्कार शिबिराची भावपूर्ण सांगता; ‘निर्व्यसनी राहून देशसेवा करू’ अशी बालकांची प्रतिज्ञा
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराची दिनांक १४ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात सांगता करण्यात आली. संत-साधू, कीर्तनकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला.
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात परिसरातील तब्बल २०० हून अधिक बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पहाटे ५ वाजता दिवसाची सुरुवात होत योगासन, प्राणायाम, नैमित्तिक श्लोक, मंत्रपुष्पांजली, हनुमान चालीसा, संतवाङ्मय अभ्यास, विविध विषयांवरील व्याख्याने, हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
गेल्या सहा वर्षांपासून लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ या संस्थेमार्फत चालविण्यात येणारी ही संस्था अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि संस्कारक्षम उपक्रम राबवत आहे. संस्थेमध्ये सुमारे ७० निवासी मुले-मुली राहून शिक्षण व संस्कार घेत आहेत. मोबाईल, व्यसन आणि चुकीच्या सवयींपासून मुलांना दूर ठेवत त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई पाटील आणि योगेश महाराज पाटील हे सातत्याने कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे हे संपूर्ण शिबिर पूर्णतः मोफत आयोजित करण्यात आले होते. परिसरातील दानशूर व्यक्तींनी मुलांच्या नाश्ता, भोजन, थंड पेय यासह सर्वच सुविधांची जबाबदारी उचलून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शिबिराची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी कीर्तनकार रविंद्र महाराज तारखेडेकर, विजयजी बनसोडे, रमेशजी मोर, योगेश गणगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिबिरात शिकलेल्या गोष्टींची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तिका आणि भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना निरोप देताना संस्थेच्या अध्यक्षा “अनाथांची माय” सुनीताताई पाटील आणि योगेश महाराज पाटील भावुक झाले. त्या क्षणी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने प्रतिज्ञा केली की — “आम्ही आयुष्यभर निर्व्यसनी राहून आई-वडिलांची आणि देशाची सेवा करू.”
आजच्या मोबाईल आणि व्यसनाधीनतेच्या काळात मुलांमध्ये संस्कार, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम रुजविणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून पाचोरा शहरात या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment