पहाण येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता’ कामाचा शुभारंभग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल

राजेंद्र खैरनार  सत्य शोध न्युज  | मुख्य संपादक
नांद्रा (ता. पाचोरा), दि. २ : पाचोरा तालुक्यातील पहाण परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या समस्येला अखेर मार्ग मिळण्यास सुरुवात झाली असून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता’ योजनेअंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात संपन्न झाला. या कामामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती वाहतुकीला गती मिळणार असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पहाण येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते शेत परिसरापर्यंतचा हा पाणंद रस्ता तयार करण्यात येणार आहे. संबंधित कामासाठी आवश्यक प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. राज्य शासनाच्या निधीतून हे काम करण्यात येत असून ग्रामीण भागातील शेती रस्ते सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानले जात आहे.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना वाहतुकीसाठी वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून शेती विकासालाही चालना मिळेल.
कार्यक्रमाला जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे तसेच गटविकास अधिकारी तुकाराम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील शेतपाणंद रस्त्यांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद