बांबरुड(रा) येथील वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेल्या केळी व फळबागांना न्याय कधी?वर्ष उलटले तरी नुकसान भरपाई नाही; संतप्त शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील व तहसीलदारांना निवेदन
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे दि. ११ जून २०२५ रोजी झालेल्या भीषण वादळी वारा व मुसळधार पावसामुळे केळी तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले तरी अनेक नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर दि. १२ मे २०२६ रोजी बांबरुड (रा.) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत मा. आमदार किशोर आप्पा पाटील तसेच पाचोरा तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन तातडीने नुकसान भरपाई मंजूर करून देण्याची जोरदार मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, वादळी वाऱ्यामुळे केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या होत्या. अनेक फळझाडे उन्मळून पडली होती. त्या वेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, तहसीलदार तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे करण्यात आले होते व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप कोणतीही मदत जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सततच्या नैसर्गिक संकटांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कर्ज, शेतीचा खर्च व उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी तसेच २०२४ मधील नैसर्गिक आपत्तीमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी गावातील शेतकरी संभाजी पाटील, मधुकर पाटील, नानाभाऊ वाघ, मनोज वाघ, राकेश कोळी, कैलास चौधरी, सुनील पाटील, रामचंद्र मोरे, सुनील कोळी, बंटी पाटील, देविदास पाटील, विठ्ठल गवळी, सचिन वाघ, अनिल सांगळे, जयेश आढाव, सागर पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांबरुड (रा.) येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्यक्ष दिलासा कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment