“अनाथांच्या ओठांवर थंड पाण्याचा दिलासा… भैरवनाथ मित्र मंडळ,यारी दोस्ती ग्रुपचा माणुसकीचा झरा पाचोर्यात अविरत!”
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा : भर उन्हाळ्यात जिथे सर्वसामान्य माणूसही थंड पाण्याच्या शोधात भटकताना दिसतो, अशा कडक उन्हात आई-वडिलांच्या मायेपासून वंचित असलेल्या निराधार बालकांच्या तहानेची जाणीव ठेवत पाचोरा शहरातील भैरवनाथ नगर परिसरातील “यारी दोस्ती ग्रुप” ने एक हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबवत लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था येथे वॉटर कुलर भेट देत माणुसकीचा आदर्श निर्माण केला.
शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमामुळे संस्थेतील अनाथ मुला-मुलींना आता थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे. समाजात अजूनही संवेदनशील माणसं जिवंत आहेत, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग ठरला.
या प्रसंगी यारी दोस्ती ग्रुपचे प्रविण भिमराव पाटील, निखील राजेंद्र अग्रवाल, रवींद्र भिमराव पाटील, गणेशभाऊ राजाराम पाटील पत्रकार तथा डॉ. योगेशजी पाटील, पाचोरा पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक योगेश गणगे साहेब, पिंटुभाऊ दिंगबर पाटील, योगेश कोळी, आबा महाजन, अकिल तडवी, राजेंद्र कुसुंबे, सुनिल दिंगबर पाटील, गणेश भोसले, शरद महाजन, दिलीपभाऊ माळी तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, याच ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वीही संस्थेतील मुलांना भोजनदानाचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी संस्थेतील मुलांना गरम पाणी प्यावे लागत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर “या लेकरांसाठी थंड पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे,” अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली होती. त्या भावनेतूनच यारी दोस्ती ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत वॉटर कुलर देण्याचा संकल्प पूर्ण केला.
पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था ही केवळ संस्था नसून निराधार मुलांसाठी मायेचं घर बनली आहे. भागवताचार्य योगेशजी धामणगावकर महाराज आणि “अनाथांची माय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह.भ.प. सुनीताताई पाटील या निराधार मुला-मुलींचा आई-वडिलांसारखा सांभाळ करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे अनेक दानशूर व्यक्ती संस्थेला अन्नदान, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, कपडे आणि विविध प्रकारचे सहकार्य करत असतात.
आजच्या स्वार्थी युगात स्वतःपुरतं जगणाऱ्यांची संख्या वाढत असताना, दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि तहान ओळखून मदतीचा हात पुढे करणारी माणसं समाजासाठी आशेचा किरण ठरत आहेत. “यारी दोस्ती ग्रुप” ने दिलेला हा वॉटर कुलर केवळ एक यंत्र नसून, तो समाजातील जिवंत माणुसकीचा थंडावा आहे — जो या निराधार लेकरांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहणार आहे.
Comments
Post a Comment