"पावसाळ्यापूर्वीच पाचोरा नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये!”नालेसफाईला युद्धपातळीवर वेग; जेसीबी, टिपर, स्वच्छता पथके रस्त्यावर — पाणी तुंबण्यापूर्वी प्रशासन सज्ज


राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूजपाचोरा : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषद प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून शहरातील नाले, गटारी आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांच्या स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने कोणतीही हयगय न करता मान्सूनपूर्व कामांना गती दिली आहे.

दिनांक २५ मे २०२६ रोजी मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील यांनी नगरपरिषदेत विविध विभागांची आढावा बैठक घेत शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने नालेसफाई मोहीम राबविण्याचे आदेश दिले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने शहरभर मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उतरवले आहे.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर, निवासी वस्त्या, शाळांच्या आजूबाजूचे भाग तसेच पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या संवेदनशील परिसरांमध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाळ, प्लास्टिक कचरा, झाडाझुडपे आणि नाल्यातील अडथळे हटविण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढण्यात येत असल्याने नाल्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे नालेसफाईदरम्यान बाहेर काढण्यात आलेला कचरा तात्काळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरू नये तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.

दरम्यान, नगरपरिषद आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी व निर्जंतुकीकरण मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली आहे. अधिकारी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेत असल्याने संबंधित विभागांवर प्रशासनाचा वॉच कायम आहे.

मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे की, घरगुती तसेच प्लास्टिक कचरा नाल्यात टाकू नये. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे नाले तुंबून पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज होत असताना दुसरीकडे नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून “यंदा तरी पाचोरकरांना पाणी तुंबण्याच्या संकटातून दिलासा मिळणार का?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद