कोळगाव विद्यालयाला लाभले शिस्तप्रिय व गुणवंत नेतृत्व; प्राचार्यपदी आर.आर.वळखंडे यांची नियुक्ती

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल

भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील गो. पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नवीन प्राचार्य म्हणून अनुभवी व कर्तव्यदक्ष शिक्षणतज्ज्ञ श्री. आर. आर. वळखंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याची भावना शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

श्री. वळखंडे यांनी यापूर्वी माध्यमिक विद्यामंदिर महिंदळे, ता. भडगाव तसेच सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज आमडदे, ता. भडगाव येथे प्राचार्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच शिस्तबद्ध प्रशासन, शिक्षकांमध्ये समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि विद्यार्थीकेंद्री नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

नवीन पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. वळखंडे यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या शैक्षणिक युगानुसार डिजिटल शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व संस्थेच्या सहकार्याने विद्यालयाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, व्हा. चेअरमन डॉ. पुनमताई प्रशांत पाटील, सचिव दादासाहेब प्रशांत विनायकराव पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन नवीन प्राचार्यांचे स्वागत केले व त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणासोबत संस्कारांचीही जोपासना व्हावी, या दृष्टीने श्री. वळखंडे यांचे नेतृत्व विद्यालयासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद