जारगाव चौफुलीत गॅस माफियांवर धडक कारवाई ; १८ सिलेंडर जप्त, आरोपीस नोटीस देण्यात आली आहे....!पुरवठा विभाग–पोलिसांचा संयुक्त छापा ; घराखालील गोडाऊनमधून उघड झाला अवैध साठ्याचा धक्कादायक प्रकार
✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकारावर अखेर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. पुरवठा विभाग व पाचोरा पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या धाडीत तब्बल ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अकबर मशिदखान (वय ३८, रा. जारगाव चौफुली) यास ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांना जारगाव चौफुली येथे एका घराखालील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस सिलेंडर साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांना कारवाईसाठी पाठविण्यात आले.
दुपारी सुमारे १ वाजेच्या दरम्यान पुरवठा विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी घराखालील गोडाऊनमध्ये एचपी, GAS-ONE, BPCL आणि HPCL कंपनीचे एकूण १८ गॅस सिलेंडर आढळून आले. त्यामध्ये १४ व्यवसायिक व ४ घरगुती सिलेंडरचा समावेश होता. तसेच ९ भरलेले आणि ९ रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान अकबर मशिदखान हा घटनास्थळी आढळून आला. चौकशी केली असता संबंधित सिलेंडर स्वतःच्या मालकीचे असल्याची कबुली त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व सिलेंडर जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्वलनशील गॅस सिलेंडरचा अवैध साठा हा केवळ कायद्याचा भंग नसून नागरिकांच्या जीवितालाच गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार आहे. निवासी भागात अशा प्रकारे सिलेंडर साठवणे म्हणजे एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई करून संभाव्य अनर्थ टाळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
Comments
Post a Comment