गुणवंतांचा घरोघरी जाऊन सत्कार; श्री. गो.से. हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम चर्चेत
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा जपणारी ओळख निर्माण केलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा घरी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि पालकांच्या त्यागाचा सन्मान करणारा हा उपक्रम पाचोरा शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
दहावी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शाळेचे नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे सर व उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बुके, पेढे देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचे नसून सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाचे फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. “विद्यार्थ्यांनी यश मिळवून थांबू नये, तर पुढील आयुष्यातही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत,” असा प्रेरणादायी संदेशही शिक्षकांनी दिला.
या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रेरणा मिळत आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केल्यामुळे पालकांनीही समाधान व्यक्त करत शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रीतम पाटील सर, श्री. आर.बी. कोळी सर यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि स्पर्धात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment