डिजिटल जनगणनेत पाचोरा तालुका आघाडीवर; ‘स्व-गणना’ मोहिमेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद!


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : भारताच्या १६ व्या आणि पहिल्यावहिल्या डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘स्व-गणना’ (Self Enumeration) मोहिमेला पाचोरा तालुक्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासनाच्या जनजागृती मोहिमेला मोठे यश मिळताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक स्वतःहून आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवत असल्याने ही मोहीम तालुक्यात प्रभावीपणे पुढे सरकत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ १ मे रोजी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या पुढाकारातून करण्यात आला. तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते या मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी १ मे ते १५ मे दरम्यान प्रत्येक नागरिकाने स्वतःहून ‘स्व-गणना’ प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले होते.

या मोहिमेविषयी माहिती देताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, भारताच्या इतिहासातील ही पहिली डिजिटल जनगणना असून नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे वेळेची बचत, अचूक माहिती संकलन आणि लोकसहभाग वाढण्यास मोठी मदत होत आहे. शासनाच्या डिजिटल उपक्रमाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाचोरा तालुक्यात या मोहिमेचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. प्रांत अधिकारी भूषण अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यासह योगेश महाराज धामणगावकर, मौलाना जीशान रजा, मौलाना नईम रजा, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, किरण काटकर, रफिक बागवान, शिक्षक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विकास पाटील, विजय ठाकूर, जावेद रहीम आदी मान्यवरांनी नागरिकांना स्वयं-गणना पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, १६ मेपासून सुरू होणाऱ्या घरोघरी जनगणना मोहिमेसाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या प्रगणकांनी स्वतःची ‘स्व-गणना’ पूर्ण करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

डिजिटल भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाचोरा तालुक्याने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद