"नरसापूरच्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे;आरोपीला तात्काळ फाशी द्या — शिवसेना महिला आघाडीचा आक्रमक एल्गार”
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनेल
(दि.७/५/२०२६)
पुणे जिल्ह्यातील नसरापूर-भोर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या नराधम आरोपीला फास्टट्रॅक न्यायालयामार्फत तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाला निवेदन सादर केले.
आज दि.७/५/२०२६ गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी दहा वाजता महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. ललिता ताई पाटील यांनी केले होते. “आज दुसऱ्याच्या मुलीवर अत्याचार झाला, उद्या अशी वेळ आपल्या घरावर येऊ नये यासाठी समाजाने जात-धर्म बाजूला ठेवून एकत्र उभे राहिले पाहिजे,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार ,तसेच उपविभागीय कार्यालयात प्रांताधिकारी श्री. भूषण अहिरे साहेब, तसेच पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. आरोपीवर कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करताना राज्यात वारंवार घडणाऱ्या महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत कठोर कायदे आणि त्वरित अंमलबजावणीची आवश्यकता अधोरेखित केली. “महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ राजकारणाचा विषय नसून समाजाच्या अस्तित्वाशी निगडित आहे,” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विशेषतः सौ. मंदाकिनी ताई पारोचे (शहर प्रमुख, शिवसेना) तसेच सौ. अनिताताई पाटील (शहर प्रमुख, शिवसेना) यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या या घटनेत दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशीच भावना आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment