जात प्रमाणपत्रासाठी महादेव कोळी-मल्हार कोळी समाजाचा एल्गार; संभाजीनगरात आठ लढवय्यांचे आमरण उपोषण सुरू...“एक दिवस समाजासाठी… आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी” घोषणेसह मराठवाडाभरातून पाठिंब्याची हाक...जात वैधता प्रश्नावर निर्णायक लढा; मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे आंदोलन नियोजन जाहीर...
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रश्नावर आता निर्णायक संघर्ष उभा राहिला असून, समाजातील आठ लढवय्ये बांधव रविवार दि. ३ मे २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. समाजाच्या अस्तित्वाशी आणि भावी पिढ्यांच्या शैक्षणिक-नोकरीच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
मराठवाड्यातील महादेव कोळी-मल्हार कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता मिळविताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना समाजबांधवांमध्ये तीव्र आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय योजनांचा लाभ आणि रोजगाराच्या संधी या प्रमाणपत्रांअभावी अडखळत असल्याने समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टीएसपी क्षेत्रातील आदिवासींप्रमाणे महादेव कोळी-मल्हार कोळी समाजालाही जात प्रमाणपत्र व वैधता सुलभ पद्धतीने मिळावी, या प्रमुख मागणीसाठी समाजातील आठ बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रखरखत्या उन्हात आणि तीव्र तापमानात सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
या आमरण उपोषणात चंद्रहंस नलमले (निलंगा), अच्युतराव सोगे (सोनपेठ), शंकरराव गंगाधरे (परळी वैजनाथ), सौ. रेणुकाताई घोरपडे (पूर्णा), रोहिदास एम्बलवाड (पालम), गजानन चंदेवाड (अहमदपूर), सुभाष कांबळे (कळंब) आणि संदीप गवळे (सिल्लोड) हे समाजबांधव सहभागी झाले आहेत.
“एक दिवस समाजासाठी… आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी” हे घोषवाक्य देत समाजाने एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे स्वतंत्र नियोजन जाहीर करण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यातील समाजबांधवांनी ठरलेल्या दिवशी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहून धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील युवक, कार्यकर्ते, माता-भगिनी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलनाला व्यापक पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. “प्रत्येकाने फक्त एक दिवस समाजासाठी द्यावा आणि सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवावे,” असा संदेश समाजामध्ये दिला जात आहे.
जिल्हानिहाय आंदोलनाचे नियोजन पुढीलप्रमाणे :
दि. ४ मे २०२६, सोमवार – छत्रपती संभाजीनगर जिल्हा
दि. ५ मे २०२६, मंगळवार – परभणी जिल्हा
दि. ६ मे २०२६, बुधवार – लातूर जिल्हा
दि. ७ मे २०२६, गुरुवार – नांदेड जिल्हा
दि. ८ मे २०२६, शुक्रवार – बीड जिल्हा
दि. ९ मे २०२६, शनिवार – धाराशिव जिल्हा
दि. १० मे २०२६, रविवार – जालना जिल्हा
दि. ११ मे २०२६, सोमवार – हिंगोली जिल्हा
Comments
Post a Comment