संजय गांधी, श्रावणबाळ योजनाधारकांसाठी महत्त्वाची सूचना; 31 मे पूर्वी डिजिटल हयात प्रमाणपत्र अनिवार्य अन्यथा वेतन बंद होणार!



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज
पाचोरा : तहसिल कार्यालय पाचोरा (संजय गांधी शाखा) मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध निवृत्तीवेतन योजनांतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, संबंधित सर्व लाभार्थ्यांनी दि. 31 मे 2026 पूर्वी ऑनलाईन डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांचे निवृत्तीवेतन ऑनलाईन पद्धतीने आपोआप बंद होणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

तहसिलदार विजय शिवाजी बनसोडे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये दरवर्षी पात्र लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र तसेच उत्पन्न प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व लाभार्थ्यांनी स्वतः किंवा जवळच्या सी.एस.सी. केंद्रामार्फत अथवा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात जाऊन “ऑनलाईन बेनिफिशरी सत्यापन अॅप” वर डिजिटल हयात प्रमाणपत्र तातडीने नोंदवून घ्यावे. अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे.

विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आली असून, ज्यांनी अद्याप तहसिल कार्यालय पाचोरा येथे दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र, आधार कार्ड व बँक पासबुक सादर केलेले नाही त्यांनी तात्काळ कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील नाव व जन्मतारखेमध्ये तफावत आढळून येत असल्याने अशा लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल तसेच नगरपरिषद प्रशासनाला गाव चावडी व कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर जाहीर निवेदन लावून प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वृत्तपत्र प्रतिनिधींनाही ही माहिती विनामूल्य प्रसिद्ध करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, अनेक वृद्ध, निराधार, विधवा व दिव्यांग नागरिकांचे उदरनिर्वाह या योजनांवर अवलंबून असल्याने प्रशासनाने दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अन्यथा केवळ तांत्रिक कारणांमुळे पात्र लाभार्थ्यांचे वेतन बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन तहसिल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रस्तुत बाबत काही अडचण असल्यास संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक (कोतवाल) किंवा संजय गांधी शाखा, तहसिल कार्यालय पाचोरा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद