पाचोरा शहरात दूषित पाणीपुरवठा; अवैध रेती उपशामुळे जनआरोग्य धोक्यात, नगरपरिषदेवर कारवाईचा दबाव!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोराः पाचोरा शहरात सध्या नागरिकांना अत्यंत अस्वच्छ व गाळयुक्त पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात प्रभावी पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) यंत्रणा नसल्याने केटी वेअरमधून थेट पाणी उचलून ते नागरिकांना वितरित केले जात आहे. मात्र, सध्या या भागात अवैध रेती उपशाला मोठ्या प्रमाणावर ऊत आला असून, यंत्रांच्या सहाय्याने सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारवायांमुळे पाण्याची गुणवत्ता पूर्णतः खालावली आहे.
या अवैध उपशामुळे केटी वेअरमधील पाणी गढूळ व दूषित झाले असून, कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता तेच पाणी थेट जलवाहिन्यांद्वारे नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत आहे. विशेषतः जुन्या पाचोरा भागातील कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नाईलाजास्तव हेच पाणी वापरावे लागत असल्याने जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची मागणी करत भाजपा नगरसेवक राहुल गायकवाड यांनी पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी केटी वेअर परिसरातील अवैध रेती उपसा तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने समन्वयाने बैठक घेऊन शहरासाठी कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ भरारी पथक नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर तीव्र संताप निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment