दारुबंदी कारवाईचा पाचोऱ्यात धडाका! हिवरानदीपात्र ते तारखेडा शिवारात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त
— राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (जळगाव) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांच्या आदेशानुसार दारुबंदी कायद्यांतर्गत कडक व प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान वाघुलखेडा शिवारातील हिवरानदी पात्रात आरोपी याकुब गनी हुसैन रिचवाले (वय 42, रा. सिंधी, ता. भुसावळ, ह.मु. वाघुलखेडा) हा बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला. त्याच्याकडून सुमारे 16,000 रुपयांचा मुद्देमाल, 150 लिटर गुळ-मोह मिश्रित रसायन व 10 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन गु.र.नं. 169/2026 अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तारखेडा शिवारातील धरणाखालील भागात आरोपी भगवान रघुनाथ भिल (रा. तारखेडा, ता. पाचोरा) हा देखील बेकायदेशीर दारू गाळताना आढळून आला. त्याच्याकडून सुमारे 23,000 रुपयांचा मुद्देमाल, 200 लिटर रसायन व 30 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून पाचोरा पोलीस स्टेशन गु.र.नं. 170/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही ठिकाणी तिन दगडांची चुल व पत्री ड्रम वापरून हातभट्टी दारू तयार केली जात होती. पोलिसांनी वेळेत छापा टाकून अवैध धंद्यावर मोठा आघात केला आहे.
सदर कारवाईत पोलीस हवालदार दिलीप वाघमोडे, अशोक हटकर व योगेश पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार या कारवाईतून स्पष्ट झाला आहे.
Comments
Post a Comment