पाचोऱ्यात महावितरणचा बेजबाबदार कारभार; विनाकारण वारंवार वीज खंडित, उन्हाळ्यात नागरिकांचे हाल — लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक. सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा शहरात महावितरण विभागाच्या निष्काळजी आणि मनमानी कारभारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोणतेही ठोस कारण नसताना वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असून दिवस असो वा मध्यरात्र, अचानक लाईट बंद करून नागरिकांचे हाल होत आहेत.
विशेषतः सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उकाड्यामुळे नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. प्रत्येकाकडे इन्व्हर्टर, बॅटरी किंवा सोलर सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे.
महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्यास “फॉल्ट शोधणे सुरू आहे” असे सांगून वेळ मारून नेली जाते. किरकोळ कारणांवरही दोन-दोन तास वीज बंद ठेवण्याचे प्रकार वारंवार घडत असून, नागरिकांच्या संयमाचा अंत होत आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षाकडून यावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. निवडणुका नसल्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
मागील चार ते सहा महिन्यांपूर्वी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही सुधार दिसून आलेला नाही.
दरम्यान, वीज बिल वेळेवर न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित करणारे महावितरण, स्वतःच्या सेवेबाबत मात्र गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी न्याय मागावा तरी कोणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सिंधी कॉलनी, कृष्णापुरी, रंगार गल्ली या भागांना ग्रामीण लाईनशी जोडण्यात आल्यामुळे या भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक असल्याची तक्रारही समोर येत आहे.
पाचोरा तालुक्याचे आमदार, तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षांनी तात्काळ लक्ष घालून महावितरण विभागाला जाब विचारावा आणि नागरिकांचा होणारा त्रास थांबवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद