आरटीई प्रवेशात पारदर्शकतेची कडक अंमलबजावणी” : अर्ज पडताळणीला वेग, चुकीच्या माहितीस कारवाईचा इशारा!
पाचोरा - येथील गट साधन केंद्र शिक्षण विभागात सन 2026-27 च्या 25 टक्के आरटीई प्रवेश अर्जांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू असून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली आहे.
पालकांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीची सखोल पडताळणी करूनच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे. अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, यासाठी पालकांकडून हमीपत्र देखील भरून घेतले जात आहे.
या पडताळणी प्रक्रियेत शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील, अभिजित खैरनार, शांताराम वानखेडे, कैलास बडगुजर, सीमा पाटील, सुनीता पाटील यांच्यासह इतर पडताळणी समिती सदस्य कार्यरत असून संपूर्ण कामकाज काटेकोरपणे पार पाडले जात आहे.
सदर प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत 20 एप्रिल 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली असून पोर्टलवर निवड यादीत नाव आलेल्या पालकांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे.
तसेच कोणत्याही अफवा किंवा प्रलोभनांना बळी पडू नये, असेही स्पष्ट करत आरटीई प्रवेश प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण दक्षता शिक्षण विभाग घेत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment