निशुल्क वारकरी बालसंस्कार शिबिरातून घडणार सुसंस्कृत पिढी; पाचोर्यात भव्य आध्यात्मिक उपक्रमाची घोषणा
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांमध्ये संस्कारांचे महत्त्व कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असताना, पाचोरा शहरात एक सकारात्मक आणि दिशादर्शक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुला-मुलींसाठी निशुल्क वारकरी बालसंस्कार शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ५ मे २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित या निवासी शिबिरामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे. शिबिरात श्रीमद भगवद गीता, हरिपाठ, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, हनुमान चालीसा यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, तसेच पखवाज वादन, गायन, कीर्तन प्रशिक्षण, वारकरी पावल्या यांचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच योगासने व व्यक्तिमत्व विकास यांसारख्या आधुनिक गरजांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अनाथ मुलांसाठी वर्षभर निवास, शालेय व वारकरी शिक्षणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने हा उपक्रम सामाजिक दायित्वही पार पाडणारा ठरत आहे.
शिबिरात प्रवेशासाठी ९ वर्षांवरील मुला-मुलींना संधी देण्यात आली असून, वारकरी पोशाख बंधनकारक ठेवण्यात आला आहे. तसेच शिबिरादरम्यान मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्यात्मिक व सांस्कृतिक शिक्षण घेता येईल. निवासी शिबिर असल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्य सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामागे भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर व सौ. सुनिताताई पाटील (अनाथांची माय) यांचे मार्गदर्शन लाभत असून, श्री. संजय महाराज पाचपोर (आकोला) यांचेही मार्गदर्शन शिबिरासाठी लाभणार आहे. संस्थेचे आधारस्तंभ म्हणून आदरणीय रमेशजी मोर यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
पाचोरा शहरातील रामदेव लॉन्सच्या मागे, जारगाव चौफुली येथे असलेल्या वारकरी भवनात हे शिबिर पार पडणार असून, अधिक माहितीसाठी ९५४५८५५२४३ / ७७९८७५५४३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजात सुसंस्कारित आणि चारित्र्यवान पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
।। राम कृष्ण हरी ।।
Comments
Post a Comment