अवैध धंद्याचा कारवाईचा धडाका” : सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज मोहीम; हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त, लाखोंचा मुद्देमाल नष्ट...



— राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला. प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गहुले धरण परिसर तसेच बहुळा नदीच्या काठांवर झाडाझुडपांत लपून गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले.
त्यानुसार तत्काळ पथक तयार करून शिंदाड बिट हद्दीत छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी बुधा दगडू तडवी, फरीदा बुधा तडवी, रहेमान अन्वर तडवी, सचिन मनोज तडवी (रा. शिंदाड, ता. पाचोरा) तसेच सुनिल राजू भिल (रा. इंदिरानगर, लोहारी) आणि गोपाल नागो राठोड (रा. आंबेवडगाव) यांना जागीच ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात पोलिसांना तब्बल १,५८,२५० रुपयांचा ४२१५ लिटर कच्चा व पक्का दारू साठा हस्तगत झाला. यामध्ये ३६०० लिटर कच्चे रसायन, ४५० लिटर उकळते पक्के रसायन आणि १६५ लिटर तयार गावठी दारूचा समावेश होता. सदरचा सर्व मुद्देमाल जागेवरच नष्ट करून दारू तयार करण्यासाठी उभारलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) अन्वये एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याचदरम्यान, मोंढाळे गावातही पोलिसांनी कारवाई करत विनोद अरविंद गुंजाळ यास अवैधरित्या देशी दारू विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून १५२० रुपयांच्या ३८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावरही दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोउपनि विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची ही “कारवाईचा धडाका” मोहीम परिसरात मोठा संदेश देणारी ठरली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद