“२७ एप्रिल २०२६ : रासायनिक खतांना ब्रेक, सेंद्रिय शेतीचा वेग वाढवा” – आमदार किशोर आप्पा पाटील यांचा ठाम इशारा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक,सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा, दि. २७ एप्रिल – खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळत रासायनिक खतांचा वापर कमी करावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून हवामान व बाजारभावाची माहिती घ्यावी, असा स्पष्ट आणि ठाम संदेश आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिला.
येथील आशिर्वाद हॉल येथे आज सकाळी ११ वाजता “खरीप पूर्व आढावा सभा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम २०२६” उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी पाचोरा व भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील होते. यावेळी प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार बनसोडे, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड (पाचोरा) व दिपक ठाकूर (भडगाव) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी कृषी यांत्रिकीकरणावर मार्गदर्शन करत आधुनिक साधनांचा वापर वाढवण्याचे महत्त्व पटवून दिले. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी २०२५-२६ चा आढावा सादर करत खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी, बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी व खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. अनावश्यक खत खरेदी व साठवणूक टाळण्याचेही आवाहन करण्यात आले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठ्याचे नियोजन स्पष्ट करत दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार पाटील यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संकल्पनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करत जमिनीची सुपिकता टिकवण्यावर भर दिला. तसेच कृषि निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी सुरू असलेला संप मागे घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पावसाळ्यात वादळी वारे व पावसामुळे विजेच्या यंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वीज वितरण कंपनीने सतर्क राहून तत्काळ सेवा द्यावी, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमात पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थींना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपक ठाकूर यांनी मानले.
Comments
Post a Comment