पाचोर्यात कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संपर्कप्रमुख निवडीचा जल्लोष; शिवसेनेचा भव्य मेळावा उत्साहात पार
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा आणि जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच विविध विकास सोसायट्या), मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) आणि जनगणना या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भविष्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी कार्यसम्राट आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. सत्कारप्रसंगी बोलताना त्यांनी पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
मेळाव्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती निश्चित करण्यात आली. मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण व जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच, स्थानिक विकासाचे प्रश्न आणि जनतेच्या अडचणींवर पक्षाने ठाम व आक्रमक भूमिका घ्यावी, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही करण्यात आले.
या मेळाव्यास शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment