“वॉश आऊट”चा धडाका कायम; अवैध धंदे बंद पाडणाऱ्या कल्याणी वर्मा यांच्या बदलीसाठी गैरव्यवसायिकांची देवाकडे आर्त हाक!
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाल्यानंतर सट्टा, जुगार, गावठी दारू निर्मिती व विक्री तसेच देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी आता थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी देवाला साकडे घालण्याचा अनोखा मार्ग अवलंबल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी मागील पंधरा दिवसांपासून अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत ‘वॉश आऊट’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये धाडसत्र राबवून सट्टा पेढ्या, जुगाराचे अड्डे, गावठी दारू निर्मिती व विक्रीचे ठिकाण तसेच देशी दारूच्या अवैध विक्रीवर सातत्याने कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईचा परिणाम म्हणून परिसरातील जवळपास ९० टक्के अवैध धंदे बंद पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गावागावांमध्ये शांतता निर्माण झाली असून महिलांमध्ये व सुज्ञ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक गावांमधून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी पुन्हा आपले धंदे सुरू करण्यासाठी विविध ठिकाणी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. काही जणांनी प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी घेत सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे; मात्र त्यांना अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर काही अवैध धंदे करणाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या बदलीसाठी देवाला साकडे घालण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात देवाची मूर्ती टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, पोलिसांकडून कारवाईची मोहीम अद्यापही सुरूच असून काही ठिकाणी अजूनही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळताच त्वरित धाड टाकून ते बंद केले जात असल्याचे सांगितले जाते.
परिसरातील अनेक नागरिकांनी कर्तव्यदक्ष आणि कठोर कारवाई करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची बदली करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी सुरू असलेली ही कारवाई कायम ठेवावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हायलाइट्स :
पिंपळगाव हरेश्वर हद्दीत मोठ्या प्रमाणात धाडसत्र
सट्टा, जुगार व गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई
सुमारे ९०% अवैध धंदे बंद झाल्याची माहिती
महिलावर्ग व नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
अधिकाऱ्यांची बदली होऊ नये, अशी नागरिकांची ठाम मागणी
Comments
Post a Comment