धडाकेबाज तपास कौशल्याचा सन्मान! पोहेका. राहुल शिंपी यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांचे
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
जळगाव/पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेका.) क्र. 625 श्री. राहुल काशिनाथ शिंपी यांच्या उल्लेखनीय तपास कामगिरीची दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून त्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे पोलीस विभागात समाधान व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या CCTNS क्र. 511/2025 या चोरीच्या प्रकरणाचा तपास भा. न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत सुरू होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोहेका. शिंपी यांनी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण, नियोजनबद्ध तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत महत्त्वाचे पुरावे संकलित केले.
तपासादरम्यान संशयितांचा बारकाईने मागोवा घेत त्यांनी आपल्या चिकाटी, दक्षता आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर अखेर तीन महिला आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे 32,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले. पोलीस अधीक्षकांनी आपल्या प्रशंसापत्रात श्री. शिंपी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या कामामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावल्याचे नमूद केले आहे. तसेच भविष्यातही ते याच जिद्दीने, प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या हस्ते पोहेका. राहुल शिंपी यांना हे प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे पाचोरा परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असून गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास पोलीस दलास बळ मिळत आहे.
Comments
Post a Comment