वडगाव प्र.भ. खु. येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; उभे मका, ज्वारी, चारा व ठिबक संच जळून खाक, सांगवी शिवारातील शेतकऱ्यांचे तीन ते चार लाखांचे नुकसान


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा ता. २८ — वडगाव प्र.भ. खु. येथील सांगवी शिवारात विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून उभे पीक, चारा, ठिबक संच व शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता.२८) दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिस प्रशासन, महावितरण कंपनी तसेच कृषी विभागाला दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव प्र.भ. खु. येथील शेतकरी राजेंद्र हरसिंग पाटील व चंद्रसिंग लालसिंग पाटील यांचे सांगवी शिवारातील गट क्रमांक २३/१ व २३/२ मध्ये शेती आहे. मंगळवारी दुपारी अचानक विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली.
दरम्यान, वडगाव येथील विलास पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने शेतकरी राजेंद्र हरसिंग पाटील व चंद्रसिंग लालसिंग पाटील यांना माहिती दिली. शेतकरी घटनास्थळी पोहोचले असता चार एकर क्षेत्रातील उभे मका, ज्वारी, जनावरांचा चारा, ठिबक संच, पाईप तसेच इतर शेतीपयोगी साहित्य आगीत पूर्णतः जळून खाक झालेले दिसून आले.
या घटनेत केवळ पिकांचेच नव्हे तर सुमारे ५० हजार रुपयांचे शेतीसाठी लागणारे साहित्य देखील नष्ट झाले. एकूण नुकसान तीन ते चार लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अगोदरच शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना, मध्यंतरी झालेली गारपीट, वाढते तापमान आणि नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच या आगीच्या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र हरसिंग पाटील व चंद्रसिंग लालसिंग पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, घटनास्थळी महावितरण कंपनीचे इंजिनीयर धकाते साहेब तसेच सांगवी शिवाराचे तलाठी शिरसाठ अप्पा यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी धकाते साहेब यांनी आगीबाबतचा अहवाल व नुकसानीची माहिती प्रशासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. तलाठी शिरसाठ अप्पा यांनी देखील पंचनामा करून झालेल्या नुकसानीची नोंद घेतली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..