वॉश आऊट”नंतरही अवैध धंद्यांचे जाळे कायम? व्यसनाधीनांचा ओढा बाहेरील भागांकडे; सर्वत्र कारवाईची नागरिकांची आक्रमक मागणी!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पिंपळगाव हरेश्वर : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मागील वीस दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली असून या मोहिमेमुळे सट्टा, पत्ता जुगार, गावठी दारू विक्री तसेच इतर विकृतींचे अड्डे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या “वॉश आऊट” मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली असून गेल्या काही दिवसांत पोलिसांनी सातत्याने धाडी टाकून अनेक अड्ड्यांवर कारवाई केली.
त्यामुळे परिसरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सट्टा, जुगार व दारूच्या धंद्यांवर मोठ्या प्रमाणात लगाम बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे परिसरातील वातावरण अधिक सुरक्षित व शांत झाल्याची भावना व्यक्त होत असून सुज्ञ नागरिक तसेच महिला वर्गातून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.
मात्र या कारवाईनंतरही व्यसनाधीन व्यक्ती शांत बसायला तयार नसल्याचे चित्र पुढे येत आहे. स्थानिक पातळीवरील अड्डे बंद झाल्याने काही व्यसनी लोकांनी आता नवीन मार्ग शोधला असून ते बाहेरील भागांकडे वळून सट्टा-जुगार व दारूच्या माध्यमातून आपली व्यसनपूर्ती करत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या ठिकाणी जाऊन अनेक जण दररोज हजारो रुपये उडवत असल्याचेही सांगितले जात आहे.
या व्यसनाधीनतेचा परिणाम अनेक कुटुंबांवर होत असल्याचेही पुढे येत आहे. घरातील पुरुष मंडळी दिवसन्दिवस बाहेर राहू लागल्याने घरखर्चासाठी महिलांना पुरेसे पैसे मिळत नसल्याची तक्रार आहे. परिणामी काही कुटुंबांतील महिलांना व सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून काहींना एकवेळ भाकरी खाऊन दिवस काढण्याची वेळ येत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बाहेरील भागांमध्ये विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या काही व्यक्तींचा या अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचेही खात्रीलायक वृत्त समोर येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
यासोबतच गावागावातील ग्रामपंचायतींनी अवैध धंद्यांविरोधात ठराव करून कठोर भूमिका घ्यावी, तसेच पोलीस पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरस्तरीय पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment