“दोन नंबर धंद्यावाल्यांवर करडी नजर” : पोलीस अधिकारी कल्याणी वर्मा यांची पिंपळगावात धडाकेबाज कारवाई; गुन्हेगारांमध्ये खळबळ!
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पिंपळगाव : पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कल्याणी वर्मा यांनी परिसरातील दोन नंबर धंद्यावाल्यांवर जोरदार आणि सातत्यपूर्ण कारवाया करत गुन्हेगारीला मोठा आळा घातला आहे. गेल्या वर्षभरापासून पिंपळगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वर्मा यांनी आपल्या धडाडीच्या कामगिरीने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
वर्मा या नेहमीच जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि न्याय देण्यासाठी तत्पर असतात. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे कारवाई करणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे. गुन्हेगार कोणत्याही क्षेत्रातील असो, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात त्यांनी कधीही कसूर केलेली नाही.
विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून पीडितांना दिलासा दिला आहे. याशिवाय, पिंपळगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दोन नंबर धंद्यांविरोधात त्यांनी अनेकदा धाडी टाकून कारवाई केली आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी धाडसत्र राबवत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वर्मा यांच्या या कठोर आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांमध्ये समाधान आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पिंपळगाव परिसरात त्या एक सक्षम, निडर आणि लोकाभिमुख पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करत आहेत.
Comments
Post a Comment