"निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने शिस्त, सराव आणि यशाचा जागर”
पाचोरा:-राष्ट्रसेवेची प्रेरणा, शिस्तीची शिकवण आणि यशाचा मंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा एक प्रेरणादायी उपक्रम नुकताच निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने “सैन्य दलातील शिस्त व सरावाचे दैनंदिन जीवनात उपयोग” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समाजहिताच्या ध्येयाने सतत कार्यरत असलेल्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच दिशादर्शक ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या प्रास्ताविकातून रोटरी क्लबच्या विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला. समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यभावना रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न रोटरी क्लब करत असल्याचे त्यांनी प्रभावीपणे अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले इंडियन आर्मीचे मेजर विनय पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. त्यांनी सैन्यदलातील शिस्त, कठोर सराव आणि निष्ठेचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडले. “यशाची शिखरे सर करण्यासाठी शिस्त, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न यांना पर्याय नाही,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात आणि दैनंदिन जीवनातही या गुणांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटाला न घाबरता, धैर्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे हीच खरी जिद्द असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, शाळेचे प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी श्री. भरत सिनकर, श्री. संजय कोतकर, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. कुणाल पाटील, श्री. मनोज केसवानी, श्री. जयेश केसवानी, श्री. चिंतामण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मयुरी बावले यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची जाज्वल्य भावना, शिस्तीची जाणीव आणि यशस्वी आयुष्याचा मार्ग उजळवणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment