वहिवाटी रस्त्याला अडथळा ठेवल्यास शासकीय योजना बंद!” — तहसीलदार विजय बनसोडे यांचा कडक इशारा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी |
पाचोरा तालुक्यात वहिवाटी रस्त्यांबाबत प्रशासन आता अधिक आक्रमक भूमिकेत आले असून, अडथळे निर्माण करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “रस्त्यांवर अतिक्रमण किंवा विरोध सहन केला जाणार नाही.”
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अंतर्गत श्री. रमेश जयराम महाजन (रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा) यांच्या मुळ दावा क्र. 04/2022 मध्ये दि. 28 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयाने वहिवाटी रस्त्याबाबत अर्ज मंजूर केला होता. याच निर्णयाला म. अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या न्यायालयानेही दुजोरा दिला आहे.
यानुसार दि. 27 मार्च 2026 रोजी प्रशासनाकडून मंडळ अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख विभाग व पोलीस बंदोबस्तासह संबंधित ठिकाणी जाऊन रस्त्याचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येत होती. मात्र, सामनेवाले श्री. बापू पुंडलिक हटकर (रा. नाईकनगर) यांनी यास विरोध करून अडथळा निर्माण केला. त्यामुळे पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे NCR No. 0138/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाच्या दि. 25 मार्च 2026 च्या निर्णयानुसार (पाणंद रस्ते संदर्भात) वहिवाटी रस्त्यांचा वापर हा इतर शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करत त्यांच्या पीएम किसान योजना, आधार लिंक व फार्मर आयडी पुढील 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात आले असून, सर्व शासकीय योजनांचा लाभ थांबवण्यात आला आहे.
तहसीलदार विजय बनसोडे यांचे स्पष्ट आवाहन :
“शेतकऱ्यांनी पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटी रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, रस्ते नांगरून पिके घेऊ नयेत किंवा इतर शेतकऱ्यांना अडथळा निर्माण करू नये. अन्यथा शासनाच्या नव्या धोरणानुसार कठोर कारवाई होणार आहे.”
प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment