एपीआय कल्याणी वर्मा यांचा धडक निर्णय; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची सट्टा बेटिंगच्या सूत्रधारांवर थेट कारवाई, नागरिकांकडून जोरदार स्वागत
आजच्या घडीला जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध सट्टा बेटिंगचा व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई, कल्याण, वरळी मटका तसेच इतर नावाखाली चालणारा हा सुट्ट्यांचा अवैध व्यवसाय जिल्ह्यातील अनेक तालुके, मोठी शहरे आणि गावा-गावातील गल्लीबोळांपर्यंत पोहोचला आहे.
या सुट्ट्यांच्या विळख्यात अल्पवयीन मुले, तरुण वर्ग तसेच काही ठिकाणी जेष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर अडकत असल्याचे वास्तव समोर येत आहे. जलद पैशाच्या हव्यासापोटी अनेकांनी या जुगाराच्या नादात आपली आर्थिक परिस्थिती डबघाईस आणली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सट्टा पेढ्या चालवणाऱ्या बुकींवर कारवाई केली जाते. मात्र कायद्यातील काही पळवाटांचा फायदा घेत सट्टा घेणारे बुकी कारवाईनंतर काही तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी सट्टा सुरू करत असल्याचे प्रकारही वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती.
याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय कल्याणी वर्मा यांनी सट्टा बेटिंगचा व्यवसाय मुळासकट उखडून टाकण्याचा निर्धार करत थेट या अवैध धंद्याच्या मुळावरच घाव घालण्याची मोहीम हाती घेतली असून फक्त सट्टा पेढ्या चालवणाऱ्या छोट्या बुकींवर कारवाई करण्याऐवजी या अवैध धंद्याला पडद्यामागून चालना देणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे आतापर्यंत आडोशाला राहून सट्टा पेढ्या चालवणाऱ्या मुख्य बुकींचे चेहरे आता जनतेसमोर उघड होत आहेत.
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध सट्टा बेटिंगच्या जाळ्याला मोठा धक्का बसला असून या धंद्याशी संबंधित अनेकांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे समजते. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रामुख्याने सट्टा घेणाऱ्या स्थानिक बुकींवर कारवाई होत असे. मात्र आता या अवैध व्यवसायाचे खरे सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या मुख्य बुकींवरही प्रथमच कारवाई होत असल्याने सुज्ञ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवैध सट्टा बेटिंगविरोधात उचललेले हे पाऊल सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे असल्याची भावना व्यक्त होत असून या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नागरिकांनीही अशा अवैध धंद्यांविषयी माहिती पोलिसांना देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment