आव्हानांतून गरुडझेप : डॉ. सुवर्णा पाटील यांना पीएच.डी. प्रदान; महिलांच्या मानसिक स्वास्थ्याचा जागर

राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी)
आजच्या आधुनिक युगात स्त्रीने चूल आणि मूल या चौकटीपलीकडे जाऊन अंतराळापासून प्रशासनापर्यंत सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मात्र ही प्रगती साधताना महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन पाचोरा येथील श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुवर्णा राजेंद्र पाटील यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नुकतीच प्राप्त झालेल्या पीएच.डी. पदवीच्या निमित्ताने हा गौरव सोहळा पार पडला.
प्रा. डॉ. सुवर्णा पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. साक्री येथील डॉ. जयप्रकाश चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी "पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर नोकरीच्या संस्कृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास" या विषयावर सखोल संशोधन करून शोधप्रबंध सादर केला.
पोलीस दलातील कठीण आणि तणावपूर्ण नोकरीचा त्यांच्या मानसिक, शारीरिक तसेच कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम त्यांनी संशोधनातून शास्त्रीय पद्धतीने मांडला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. राजेंद्र पाटील यांच्या त्या धर्मपत्नी असल्यामुळे पोलीस दलातील परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवली असून, त्यांच्या या संशोधनामुळे भविष्यात पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडण्यास मार्गदर्शन मिळणार असल्याचे मानले जात आहे.
महिला दिनानिमित्त “आव्हानांमधून उभारी घेणारी आधुनिक स्त्री” या विषयावर बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या की, “मानसिक स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर मन शांत, संतुलित आणि सकारात्मक असणे होय. स्त्री मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तरच ती आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते आणि समाजात प्रभावीपणे कार्य करू शकते.”
नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. घरातील पुरुषांनी आणि समाजाने जबाबदाऱ्यांमध्ये समान सहभाग घेतल्यास स्त्री अधिक जोमाने प्रगती करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यशस्वी आणि संतुलित जीवनासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा सल्ला दिला. त्यामध्ये कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढणे, छंद जोपासणे, नियमित योगासने व संतुलित आहार घेणे तसेच ताण जाणवल्यास कुटुंबीयांशी किंवा तज्ज्ञांशी संवाद साधणे यांचा समावेश आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सुवर्णा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक, सहकारी व कुटुंबीयांना दिले.
यावेळी त्यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करताना म्हटले,
“नाजूक दिसते पण ताकद पर्वताएवढी असते; स्वप्नांना पंख देऊन आकाश गाठण्याची जिद्द तिच्यात असते.”
अशा शब्दांत त्यांनी सर्व कष्टकरी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद