“पंचरत्न प्रतिष्ठानचा महिला महोत्सव उत्साहात; ‘स्वतःसाठी पळा’ मॅरेथॉनसह महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ”
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):
जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे महिलांच्या सुप्त कलागुणांना व क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय महिला महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ७ व ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना शहर व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ७ मार्च रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीमती पाचोरा स्पर्धा, संदेशपर उखाणा स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, एकल नृत्य तसेच समूह नृत्य स्पर्धा यांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या कला, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वतःसाठी पळा’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याखाली प्रथमच महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे १५० महिलांनी उत्साहाने धाव घेत आरोग्याबाबत जागरूकता आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला. महिलांनी दाखवलेला हा उत्साह आणि सहभाग कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.
पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी पहिल्यांदाच असा व्यापक महिला महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे महिलांनीही दोन्ही दिवसांच्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.
या महिला महोत्सवासाठी मा. नगराध्यक्षा सौ. सुनीता ताई पाटील, सौ. सुचेता ताई वाघ, सौ. वैशाली ताई सूर्यवंशी, सौ. ज्योती ताई वाघ, सौ.जयश्री ताई पाटील, सौ. भाग्यश्री पाटील, मयुरी ताई बिल्दीकर, वैशाली प्रदीप पाटील तसेच सौ. मिनाक्षीताई संजय एरंडे यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली पाटील, अंजली गवंदे, सुषमा पाटील, प्रीती सोनवणे, मंजुश्री शिरसमने यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, स्वाती पाटील, सोनाली येवले, चांदणी महाजन, गौरी भट, रुपाली पाटील आणि राजश्री पाटील यांनी मदतनीस म्हणून सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा महिला महोत्सव पाचोरा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, भविष्यातही अशा उपक्रमांमुळे महिलांना नवे व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment