लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार यादी पुनरीक्षण अभियान; प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचे
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा :
भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी एसआरआय (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत पाचोरा तालुक्यात २३३ तर भडगाव तालुक्यात १२१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचा उद्देश अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे हा असून, ही लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. या प्रक्रियेत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची नोंदणी व अद्ययावतीकरण केले जात आहे.
स्थानिक व ग्रामपातळीवर नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्ती, मृत किंवा दुबार नावे वगळणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांची पडताळणी केली जात असून, काही ठिकाणी मतदार मयत, स्थलांतरित किंवा दुबार नोंद असण्याची शक्यता असल्याने त्याची माहितीही बीएलओमार्फत संकलित केली जात आहे.
या विशेष मोहिमेमुळे मतदार याद्यांमध्ये अचूक व पारदर्शक माहितीची नोंद होऊन मतदार यादी अधिक विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम देशभरासह महाराष्ट्रात आणि संबंधित मतदारसंघांमध्ये राबविण्यात येत आहे.
त्यामुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व आपल्या मतदार यादीतील नावाबाबत आवश्यक माहिती संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment