रमजान निमित्त पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये इफ्तार मेळावा; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा :
पवित्र रमजान महिन्यानिमित्त पाचोरा पोलीस स्टेशन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सौहार्दाचा संदेश देण्यात आला.
पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा सोडल्यानंतर सर्वांनी एकत्र येत इफ्तार केला आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. बापू रोहम, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक सी. एन. चौधरी सर, प्रा. शिवाजी शिंदे सर तसेच शहरातील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील मौलाना व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment