जागतिक महिला दिन २०२६ विशेष : स्त्री स्वातंत्र्य की स्वैराचार? – समाजाला विचार करायला लावणारे सौ. ललिता ताई पाटील यांचे परखड मत

– राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा :
८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, प्रशासन, उद्योग, राजकारण, सामाजिक कार्य अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. मात्र या प्रगतीसोबत समाजात काही चिंताजनक बदलही दिसून येत असल्याची खंत स्पंदन काउंसलिंग सेंटरच्या संचालिका सौ. ललिता ताई कृष्णराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
“स्त्री स्वातंत्र्य की स्वैराचार?” या विचारप्रवर्तक विषयावर त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मत मांडले. काउंसलर म्हणून काम करताना त्यांच्याकडे अनेक कौटुंबिक व वैवाहिक प्रकरणे समुपदेशनासाठी येत असतात. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मतभेद निर्माण होऊन समुपदेशनाची गरज भासणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वी विवाह हा एक पवित्र व अतूट संस्कार मानला जात होता. विश्वास, समजूतदारपणा आणि कुटुंबीयांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणी सहज पार केल्या जात होत्या. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत विवाहसंस्थेवर ताण निर्माण होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अनेक ठिकाणी विवाहासाठी आर्थिक निकष, मोठा पगार, बँक बॅलन्स, बंगला यांसारख्या अपेक्षा अग्रस्थानी येत आहेत. त्याचबरोबर सासू-सासऱ्यांची जबाबदारी नको अशी मानसिकता देखील वाढताना दिसते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनाने मतभेद मिटवले जात, मात्र आता ती व्यवस्था कमी झाल्याने समस्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंध हा देखील गंभीर मुद्दा समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा घटनांचा सर्वाधिक परिणाम कुटुंबातील लहान मुलांवर होत असल्याने समाजाने या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुखी संसारासाठी परस्पर विश्वास, संयम आणि समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. अवास्तव अपेक्षा टाळून एकमेकांना समजून घेतल्यास संसार अधिक सुखकर होऊ शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला.
निसर्गाने स्त्रीला सहनशीलता आणि सर्जनशीलतेचे अद्वितीय वरदान दिले आहे. “आईमध्ये जिजाऊ असतील तरच समाजात शिवाजी महाराज घडतील”, याची जाणीव ठेवून महिलांनी समाजातील चुकीच्या प्रवृत्तींना वेळीच थांबवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आपले लिखाण परखड असल्याचे नमूद करत त्यांनी शेवटी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
– राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद