“माझा आनंद हरपला…” – श्री गो. से. हायस्कूलच्या फलकावर स्व. अजित दादांना चित्रमय श्रद्धांजली
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपार दुःखाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलच्या दर्शनी भिंतीवरील ब्लॅकबोर्डवर अत्यंत भावस्पर्शी व कलात्मक श्रद्धांजली साकारण्यात आली.
शाळेचे कलाशिक्षक सुबोध मुरलीधर कांतायन यांनी रंगीत खडू व पेपर कटिंगच्या माध्यमातून स्व. अजित दादांचे चित्रमय फलकलेखन साकारले. “दादांचे जाणे हे प्रत्येकाच्या मनाला चटके देऊन गेले” ही भावना चित्रातून ठळकपणे व्यक्त होते. विशेष म्हणजे, दादांच्या आईच्या मायेचे प्रतीक म्हणून पांडुरंगाला मुलासारखे जवळ घेतलेले चित्र रेखाटण्यात आले आहे. यामागील भावार्थ असा की, आयुष्यभर पांडुरंगाचे नामस्मरण करणाऱ्या दादांना आता पांडुरंगानेही आईची माया द्यावी.
आईच्या ममतेत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते, ही भावना या कलाकृतीतून प्रभावीपणे व्यक्त होते. स्वर्गाच्या दारात प्रवेश करताना दादांची चालतानांची खास लकब, स्वर्गाचे दार व ढगांचा प्रभाव — हे सर्व खडूच्या माध्यमातून अतिशय जिवंतपणे साकारण्यात आले आहे. तसेच पेपर कटिंगद्वारे दादांचे व्यक्तीचित्रण करण्यात आले आहे.
याचबरोबर शाळेची विद्यार्थिनी धनश्री पाटील हिनेही पेपर कटिंगच्या माध्यमातून पी.टी.सी. संस्थेचे चेअरमन मा. संजय वाघ यांचे सुरेख व्यक्तीचित्रण साकारले असून, आता विद्यार्थीही ब्लॅकबोर्डवर कलाकृती साकारण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.
या फलकलेखनाचे पी.टी.सी. संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये कला विषयाबद्दल निर्माण झालेली गोडी व आस्था पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
ही चित्रमय श्रद्धांजली केवळ एक कलाकृती न राहता, स्व. अजित दादांप्रती व्यक्त झालेली हृदयस्पर्शी भावना ठरली आहे.
Comments
Post a Comment