शाश्वत विकासाच्या दिशेने शैक्षणिक क्षेत्राचा ठोस पुढाकार; पारोळा राज्यस्तरीय परिषदेत पाचोऱ्याच्या प्रा. जयश्रीताई वाघ यांचा शोधनिबंध सादर
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी | ६ फेब्रुवारी २०२६
वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, वाढते शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणावर गंभीर संकट निर्माण झाले असून, आर्थिक प्रगती करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि किसान महाविद्यालय, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवता आणि पर्यावरण : शाश्वत विकासासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन” या विषयावर आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत शाश्वत विकासावर सखोल मंथन करण्यात आले.
या परिषदेत पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी संशोधक विद्यार्थिनी म्हणून आपला शोधनिबंध सादर करून उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या संशोधनातून पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक विकास यांचा समतोल साधण्यावर भर देण्यात आला.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांनी शिक्षकांची भूमिका दीपस्तंभासारखी असून सामाजिक विवेकशीलता हीच शाश्वत आर्थिक विकासाची खरी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर, प्रा. डॉ. विकास गीते यांनी संशोधन व शाश्वत विकासावर मार्गदर्शन केले. बीजभाषक म्हणून पुणे येथील राष्ट्रीय रसायन शाळेचे शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाच्या वापरावर सखोल विवेचन केले.
या राज्यस्तरीय परिषदेत सुमारे २०० प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून जवळपास १५० शोधनिबंध प्राप्त झाले. शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगावर व्यापक चर्चा झाली. तसेच प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी समाजाच्या गरजा संतुलित ठेवून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी शिक्षणसंस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
ही परिषद संशोधन, पर्यावरण जागरूकता आणि शैक्षणिक क्षेत्रातील नव्या दृष्टिकोनासाठी मार्गदर्शक ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या संशोधन सहभागामुळे पाचोरा तालुक्याचा शैक्षणिक क्षेत्रातील मान उंचावला असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
Comments
Post a Comment