नगरदेवळा यात्रेत पोलिसांची माणुसकी जिंकली; उपपोलीस निरीक्षक योगेश गणगे यांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे सालाबादाप्रमाणे भरलेल्या यात्रेदरम्यान गर्दी, गोंधळ आणि धावपळीच्या वातावरणात सुनिता शुभम पवार ही चिमुकली अचानक आपल्या पालकांपासून हरवली. यात्रेतील प्रचंड गर्दीमुळे घाबरलेली ही चिमुकली रडत असताना, कर्तव्यावर असलेले उपपोलीस निरीक्षक श्री. योगेश गणगे साहेब यांच्या सजग नजरेस ही बाब आली.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून योगेश गणगे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीला आपल्या ताब्यात घेत तिला विश्वासात घेतले. अत्यंत संयम, आपुलकी आणि माणुसकीच्या भावनेने त्यांनी मुलीशी संवाद साधत तिला सुरक्षित ठिकाणी बसवून शांत केले. त्यांच्या संवेदनशील वर्तनामुळे काही वेळातच घाबरलेली चिमुकली सावरली.
यानंतर योगेश गणगे साहेबांनी स्वतः पुढाकार घेत पालकांचा शोध घेण्याची तात्काळ कार्यवाही सुरू केली. प्रभावी नियोजन, सतर्कता आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे अल्पावधीतच चिमुकलीच्या पालकांचा शोध लागला. हरवलेली सुनिता पवार हिला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
आपल्या लेकीला सुरक्षित पाहताच पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यात्रेतील नागरिकांनीही या घटनेमुळे समाधान व्यक्त करत उपपोलीस निरीक्षक योगेश गणगे साहेबांच्या कर्तव्यदक्षतेचे व माणुसकीचे मनापासून कौतुक केले.
या घटनेतून नगरदेवळा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी स्थानिक पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यात किती महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सण-उत्सव व यात्रेसारख्या गर्दीच्या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तत्परता मोलाची ठरते. पाचोरा पोलिस दल आपल्या शौर्य, सेवा आणि कर्तव्यभावनेमुळे जिल्हाभरात नावाजले जात असून, योगेश गणगे साहेबांनी या प्रसंगातून पोलिस खात्याची मान उंचावली आहे.
लोकांचे अश्रू पुसणे आणि संकटात आधार देणे हेच खरे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Comments
Post a Comment