खडसे महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन; प्रा. जयश्रीताई वर्मा वाघ यांचा संशोधन निबंध प्रभावी सादरीकरण
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे पीएम उषा योजनेअंतर्गत “एकविसाव्या शतकातील मानवविद्या व वाणिज्य क्षेत्रातील बदलते प्रवाह” या विषयावर दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ही परिषद शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरली.
या परिषदेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा पालवे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी मानवविद्या व वाणिज्य शाखेतील बदलत्या प्रवाहांवर सखोल विचार मांडत शैक्षणिक संशोधनाचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले.
बीजभाषक म्हणून बनारस हिंदू विद्यापीठ येथील समाजविज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. बिंदा परांजपे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक संशोधन विषय, जागतिक शैक्षणिक प्रवाह आणि बहुविषयक अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थित संशोधकांना प्रेरणा दिली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे केवलकर या होत्या. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले, तर परिषदेचे संयोजक डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी प्रास्ताविक करून परिषदेची भूमिका स्पष्ट केली. या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून तब्बल 226 प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी नोंदणी करून सहभाग नोंदविला.
प्रा. जयश्रीताई वर्मा वाघ यांचे संशोधन सादरीकरण विशेष आकर्षण
या परिषदेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी आपला संशोधन निबंध सादर केला.
“२१ व्या शतकात आनंदी जीवन आणि नैतिक वाणिज्य संकल्पनेला चालना देणारी कार्यस्थळ संस्कृती निर्माण करण्यासाठी कर्मचार्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सकारात्मक कार्य वातावरण, मूल्याधारित संस्कृती, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामाजिक जबाबदारी यामुळे व्यवसाय आणि समाज दोन्हींचा सर्वांगीण विकास साधता येतो” या विषयावर त्यांनी सखोल संशोधन मांडले.
त्यांचे संशोधन सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरले असून उपस्थित तज्ज्ञ, प्राध्यापक व संशोधकांकडून विशेष दाद मिळाली. त्यांच्या कष्ट, सातत्य आणि समर्पणाची ही एक उत्तम फलनिष्पत्ती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती व आयोजनासाठी विशेष सहकार्य
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बी. नारायणदादा चौधरी तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. संजीव साळवे, प्राचार्या डॉ. वंदना चौधरी, परिषदेचे समन्वयक डॉ. गणेश सदाशिव चव्हाण, संयोजक डॉ. पी. एस. प्रेमसागर तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय भडगाव महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख, प्रा. निशिगंधा बोरसे तसेच एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथील प्रा. स्वप्निल भोसले यांनीही उपस्थित राहून परिषदेची शोभा वाढवली.
ही राष्ट्रीय परिषद मानवविद्या व वाणिज्य क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा देणारी ठरली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटवणारी ठरल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment