"शिवजयंतीनिमित्त पाचोरात सामाजिक जाणीवेचा जागर – स्व. अशोक भाऊ युवा फाउंडेशन व आर्यन ग्रुपकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन”
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी प्रेरणा देणारा विचार, सेवाभाव आणि जनकल्याणाचा संदेश देणारा ऐतिहासिक पर्व. शिवरायांच्या मानवतावादी विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने स्व. अशोक भाऊ युवा फाउंडेशन व आर्यन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पाचोरा येथील आधार वड, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या एका थेंबामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो, या सामाजिक जाणीवेने प्रेरित होऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या पावन पर्वावर रक्तदान करून शिवरायांच्या सेवाभाव, परोपकार आणि मानवतावादी विचारांना खरी मानवंदना देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटर, जळगाव (एम. जे. कॉलेज रोड) यांचे सहकार्य लाभणार असून, संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणार आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने शिवबा मेडिकल यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो फ्रेम तसेच आर्यन ग्रुप यांच्या तर्फे टी-शर्ट भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.
स्व. अशोक भाऊ युवा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून वर्षभर रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रम, गरजू रुग्णांना मदत, तसेच युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून युवकांमध्ये मानवतेची भावना, सेवाभाव आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरात तालुक्यातील युवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी तसेच सर्व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री. भारत गायकवाड (मो. 7038703892)
श्री. अमोल शेलार (मो. 7038703894)
“शिवरायांनी तलवारीबरोबरच जनकल्याणाच्या विचाराने स्वराज्य उभे केले. त्याच प्रेरणेने आजच्या पिढीने समाजासाठी कार्य करणे गरजेचे आहे. शिवजयंती केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर सामाजिक कार्यातून साजरी करावी,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करावी, असे आग्रहाचे आवाहन स्व. अशोक भाऊ युवा फाउंडेशन व आर्यन ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment