अखंड हरिनामाचे सामर्थ्य : पुनगावात एकाच दिवशी १०८ तरुण माळकरीव्यसनमुक्तीकडे वाटचाल करणारी तरुणाई – अध्यात्मातून घडतो नवा आदर्श

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी | पुनगाव
पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. श्रीमद् भागवत कथा सप्ताह व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे फलित म्हणून एकाच दिवशी तब्बल १०८ तरुणांनी तुळशीमाळ गळ्यात घालून निर्व्यसनी व शाकाहारी जीवनाचा संकल्प केला, ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
दि. २८ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प. योगेश पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून पुनगावातील नवतरुणांनी पुढाकार घेत बंद पडलेली अखंड हरिनाम कीर्तन व भागवत महापुराण कथेची परंपरा नव्याने सुरू केली असून, यावर्षी या उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
आज अनेक ठिकाणी तरुणाई मनोरंजनाच्या नावाखाली चुकीच्या वाटेवर जात असताना, पुनगावातील तरुणांनी एकत्र येत भक्ती, संयम आणि सामाजिक बांधिलकीचा मार्ग स्वीकारून नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांत गावातील शेकडो तरुण व्यसनाधीनतेपासून दूर जात हरिनामाच्या गजरात सहभागी होत असल्याने गावात शांतता, प्रेम आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
१०८ जणांचा ऐतिहासिक संकल्प
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याच्या कीर्तनात तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश गणगे पाटील, लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर व ह.भ.प. सुनीताताई पाटील यांच्या उपस्थितीत १०८ जणांनी तुळशीमाळ गळ्यात घालून निर्व्यसनी जीवनाचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी पुनगाव येथील ‘देशदूत’चे तालुका प्रतिनिधी चिंतामण बाजीराव पाटील यांनी १०८ तुळशीमाळा मोफत उपलब्ध करून दिल्या. माळ घालण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. १०८ जणांचा संकल्प पूर्ण झाल्यानंतरही अनेक तरुण रांगेत उभे होते. उर्वरित तरुणांना येणाऱ्या महाशिवरात्रीला तुळशीमाळ देण्यात येईल, असे ह.भ.प. योगेश महाराज यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद