चिमुकल्यांच्या मनात शिवरायांची ज्वाला; श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिरात शिवजयंतीचा प्रेरणादायी उत्सव...! इतिहास, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचा संगम; पोवाडे, शिवगर्जना आणि विचारप्रेरक मार्गदर्शनाने परिसर शिवमय

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल 

पाचोरा (प्रतिनिधी):
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर, पाचोरा येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजेचे लाडके जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शाळा परिसर भगव्या ध्वजांनी, शिवगर्जनांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शिवमय झाला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांच्या समवेत मुख्य इमारत दुपार सत्र विभागाचे प्रमुख श्री. ईश्वर पाटील सर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ शिक्षिका श्रीमती लक्ष्माबाई सोनवणे मॅडम, भडगाव रोड विभाग प्रमुख श्री. दिपक पाटील सर, सकाळ सत्र विभाग प्रमुख श्री. स्वप्नील माने सर, तसेच सौ. जयश्री वाघ मॅडम आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ओजस्वी भाषणे, ऐतिहासिक पोवाडे, देशभक्तीपर नृत्य, शिवरायांच्या वेशभूषेतील चिमुकले, तसेच जोरदार शिवगर्जना यांनी उपस्थित पालक, शिक्षक व नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली.
याचबरोबर श्री. महेश लोखंडे सर यांनी साकारलेले आकर्षक फलक लेखन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
भडगाव रोड विभाग प्रमुख श्री. दिपक पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तर पद्धतीने संवाद साधत, “आजच्या युगातील युद्ध म्हणजे अज्ञान, आळस, व्यसन आणि अन्यायाविरुद्धचे युद्ध” असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना ध्येयवादी जीवन जगण्याचा संदेश दिला.
समारोप भाषणात अध्यक्ष श्री. ईश्वर पाटील सर यांनी शिवाजी महाराजांची युद्धनीती, लाल महालातील पराक्रम, गनिमी कावा आणि दूरदृष्टी यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुसंगत व प्रभावी सूत्रसंचालन श्री. संदीप वाघ यांनी केले, तर श्री. आशिष पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गाचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद