पाचोऱ्यात ‘मिशन स्कॉलरशिप’ची धडाकेबाज अंमलबजावणी; पाचवी-आठवीच्या ५४७ विद्यार्थ्यांची सराव परीक्षा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी |
पाचोरा तालुक्यात गुणवत्तावाढीला चालना देणाऱ्या ‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे प्रभावी आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ही परीक्षा शुक्रवारी केंद्रस्तरावर शांततेत पार पडली.
गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे आणि गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे संपूर्ण तालुक्यात परीक्षा व्यवस्थापन सुरळीत राबविण्यात आले. या सराव परीक्षेत इयत्ता पाचवीचे ४३४ तर इयत्ता आठवीचे ११३, असे एकूण ५४७ विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्यक्ष शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची तयारी तपासणे, आत्मविश्वास वाढवणे आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाशी परिचय करून देणे, हा या सराव परीक्षेचा मुख्य उद्देश होता.
‘मिशन स्कॉलरशिप’ अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गही सातत्याने घेतले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, सर्व केंद्रप्रमुख, परीक्षा समन्वयक सुभाष देसले, रावसाहेब साळुंखे, सुनील शिवदे, गिरीश भोयर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व विशेष शिक्षकांनी परीक्षा पाहणीसाठी शाळांना भेटी देत मार्गदर्शन केले.
पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणखी दोन सराव परीक्षा नियोजित असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनवण्याचा ठोस पाया घातला जात असून, भविष्यात शिष्यवृत्ती यशाची संख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment