५ वर्षीय अफीफाचा पहिला रोज़ा; श्रद्धा, संयम आणि बालमनातील ईश्वरनिष्ठेचा भावनिक संगम
रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांनी दिली माहिती....
पाचोरा प्रतिनिधी:
रमजान हा मुस्लिम समाजासाठी आत्मसंयम, श्रद्धा आणि इबादतीचा अत्यंत पवित्र महिना. या पवित्र महिन्यात रोज़ा ठेवून अल्लाहची इबादत केली जाते आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मिल्लत नगर परिसरातील मोहम्मद अझहर खान फरीर खान यांची कन्या अफीफा मोहम्मद अझहर खान (वय ५) हिने आपल्या जीवनातील पहिला रोज़ा पूर्ण करून कुटुंबासह संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे.
पहाटे सुमारे ५ वाजता सहेरी करून चिमुकली अफीफाने रोज़्याची सुरुवात केली आणि सायंकाळी ६.३० वाजता इफ्तार करून रोज़ा पूर्ण केला. एवढ्या लहान वयात उपवासाचा संयम पाळत, श्रद्धा आणि धैर्याचे दर्शन घडवत तिने अल्लाहप्रती आपली भक्ती व्यक्त केली. देशात शांतता, एकता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी तिने निरागस मनाने दुआ मागितल्याने उपस्थितांची मने भावूक झाली.
अफीफाच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल आजी-आजोबा, शिक्षक, मित्रमंडळी व नातेवाईकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धार्मिक संस्कार, श्रद्धा आणि समर्पणाची ही चिमुकली प्रतिमा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ही माहिती रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment